सर्वांचं लक्ष आपल्याकडे वळवून आणि खिळवून ठेवणं हे विविध कंपन्या, टी.व्ही आणि राजकारणी यांचं एक महत्वाचं ध्येय झालं आहे. त्यामुळे एक मोठं युद्धच सुरू आहे म्हणा ना ! इंग्रजीत याला atttention-war म्हणता येईल. पण ही गोष्ट ८०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांच्या लक्षात आली होती असं म्हटलं तर तुम्ही विश्वास ठेवाल ?
श्रोत्यांना आवाहन करताना ज्ञानेश्वरीच्या एका भागात संत ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांना आवाहन केलं आहे-
तरी अवधान एकले देईजे मग सर्व सुखांसी पत्र घेईजे ।।
हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आईका ।।१।।
परी प्रौढी न बोले हो जी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी ।।
देया अवधान म्हणे हे माझी विनवणी सलगी ||२||
(श्रोतेहो, तुम्ही फक्त तुमचे लक्ष माझ्याकडे द्या, मग तुम्हाला मी सर्व सुखे मिळवून देईन हे लिहून देतो. पण तुम्हा सर्वज्ञांच्या समाजात माझे हे बोलणे प्रौढीचे आहे असे कृपया समजू नका, तुमच्याशी (प्रेमापोटी) सलगी करून मी तशी तुमची विनवणी करतो आहे.)
शब्दशक्ति या माझ्या संकेतस्थळावर ज्ञानेश्वरांच्याच शब्दात मी तुमच्याशी सलगीने विनंती करू इच्छितो, ती देखील प्रौढीनं नव्हे. जीवनाचा अर्थ १६ व्या वर्षीच समजल्यानंतर तो लोकांपुढे मांडणाऱ्याशी मी माझ्या लेखनाची तुलना करू नये हे मला समजतं. पण ज्ञानदेवांच्या पुढील ओवीनं मला माझे शब्द तुमच्यासमोर मांडण्याची शक्ती दिली आहे.
राजहंसाचे चालणे भूतली जालिया शहाणे ||
म्हणून काय इतरांनी चालावेचि ना || ||
म्हणूनच या माझ्या लेखनस्थळावर तुमचे स्वागत मी करीत आहे. तुम्हाला या लेखनाविषयी काय वाटते ते मला जरूर कळवा.