shabdashakti_image

शब्दशक्ति

शब्दांची शक्ति

नैतिकतेवर ठाम श्रद्धा ठेवून जीवनाला सरळ सामोरे जाणारे संत म्हणजे तुकाराम. आपल्या श्रद्धास्थानाला देखील आपल्या काव्यातून शिव्याशाप देताना त्यांचे शब्द त्यामुळेच अडखळत नाहीत. तुकाराम शब्दांचं सामर्थ्य जाणतात. त्यांचं जीवनच शब्दमय झालेलं त्यांना दिसतं. हे शब्दांचं धन ते शब्दांनीच वाटून टाकायलाही तयार आहेत.

आम्हा घरी धन । शब्दाचीच रत्ने ।।
शब्दाचीच शस्त्रे । यत्न करू ।।
शब्दचि आमुच्या । जीवाचे जीवन ।।
शब्दे वाटू धन । जन लोकां ।।

आपले सगळे अनुभव, ज्ञान, तुकारामांनी शब्दातच मांडले आहेत. शब्दांचा वापर करून शब्दांचीच शक्ती वर्णायची म्हणजे नदीतलं पाणी उचलून नदीलाच अर्पण करायचं म्हणाना. नदी त्यात पडलेल्या वस्तू वाहून नेते. शब्दांमधे देखील नदीची ही शक्ती आहे. शब्द अर्थ वाहून नेतात. शब्द पाठ करून किंवा लिहून ठेवून माणसांनी आपलं सगळं ज्ञान, अनुभव पुढच्या पिढ्यांसाठी साठवले. त्यालाच इतिहास म्हणतात. इतिहास म्हणजे अलीकडच्या भाषेतली मेमरीच.

इतिहास म्हटलं की मला आठवतात शिवाजी महाराज. जावळीच्या खोऱ्यात अफजलखानाला मारल्यावर त्याच्या सैन्यावर तुटून पडणारे मावळे ओरडत- हर हर महादेव ! गंमत पहा, "हर हर महादेव" हे तर शंकराची स्तुती करणारे शब्द. ते म्हटल्यावर मावळ्यांमधे आवेश निर्माण होणं आणि खानाच्या सैन्यात घबराट, ही जादूच म्हणावी लागेल. तेच शब्द वेगवेगळ्या माणसांसाठी वेगवेगळे अर्थ वाहून नेतात. हे अजब सामर्थ्य खास शब्दांचंच म्हणावं लागेल.

शब्दांमधे आणखी एक सामर्थ्य आहे. ते म्हणजे माणसाच्या मनाचा ठाव घेण्याचं. इंग्रज कवी कोलेरिज म्हणतो "Poetry means the best words in the best order !" कविता म्हणजे सर्वोत्कृष्ट क्रमानं रचलेले सर्वोत्कृष्ट शब्द. अशा या कवितेत संगीत मिसळलं की तयार होतं ते गाणं. गाणं आपल्या मनाचा ठाव घेतं. ज्ञानेश्वरांपासून ते गाडगेबाबांपर्यंत सगळ्या संतांनी त्यांचं ज्ञान, अनुभव आणि उपदेश श्लोक, अभंग, ओवी, आर्या अशा शब्दरचनांमधूनच केला. कारण याच तऱ्हेनं शद्ब आपल्या मनात घर करून राहतात.

आज इंटरनेटच्या जमान्यात कोणत्याही विषयाची माहिती मिळवायची असेल तर सर्च इंजिनचा वापर केला जातो. त्यासाठी वापरावे लागतात ते शब्दच... key-words. आजकाल चर्चेत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) गाभा आहे Large Language Models (LLM) म्हणजे शब्दच की !

भाषा हेच मानवाच्या प्रगतीचं मुख्य कारण असणार. जेव्हा आपल्या पूर्वजांना कळून चुकलं की अनेक रानटी प्राण्यांपेक्षा मानव दुबळा आहे, तेव्हा त्यांनी एकमेकांशी संधान बांधलं ते शब्दांतूनच. मग त्यांनी एकत्रित येऊन शिकार केली, शेती केली, भांडणं, युद्धं देखील केली आणि एकमेकांच्या सहकारातून सखोल शास्त्रीय संशोधनही केलं. या सगळ्यासाठी त्यांना उपयोग पडले ते शब्दच.

शब्दांनी संख्यांना साथीला घेऊन आणखी एक क्षेत्र पादाक्रांत केलेलं मला दिसतं. ते म्हणजे गणित. माणसाची आजवरची प्रगतीची दौड ही तर गणिती दौड आहे. सर बर्ट्रांड रसेल या इंग्रज गणिती आणि तत्वज्ञानं म्हटलं होतं "भारतीयांचं गणितातलं योगदान आहे शून्य". हे शब्द हुशारीनं वापरले आहेत असं नाही वाटत तुम्हाला ? (या इंग्रजाला भारतीयांचं योगदान काहीही नाही असं म्हणायचं आहे का भारतीयांनी "शून्य" या संकल्पनेची देणगी दिली असं सांगायचं आहे हे तुम्हीच ठरवा.)

कोणीतरी म्हटलं आहे- "शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा". कोणासाठी आणि कशासाठी कोणते शब्द वापरायचे हे तारतम्यानंच ठरवावं लागतं. नाहीतर अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. योग्य ठिकाणी योग्य ते शब्द वापरण्याची क्षमता असणारी व्यक्ती संवाद कुशल (आणि म्हणून यशस्वी) ठरते ती यामुळेच. पण संवाद कौशल्याचा दुरुपयोग करूनच अनेकांच्या भावना भडकवल्या जातात याला इतिहास आणि वर्तमानही साक्ष आहेच. याच शब्दांनी मानवी संस्कृतीला सह्रदयताही शिकवली आहे हे मात्र विसरून चालणार नाही.

शब्दांचं हे तारतम्य बाळगणं ही गोष्ट सोपी नाही. पण हे जमलं तर आयुष्यातलं एक मोठं कौशल्य साध्य होतं. तथागत बुद्धांनी त्यांच्या दुःखनिवारणाच्या अष्टांग मार्गातला एक मार्ग सांगितला आहेः "सम्यक वाणी". त्याचं कारण हेच असणार.

मित्रहो, सामर्थ्यवान असले तरी शब्द सर्वशक्तिमान मात्र नाहीत. जेव्हा एकमेकांची भाषा न समजणारे समोरासमोर येतात तेव्हा चित्रं वापरतात. आईनं नुसतं बाळाकडे पाहिलं की त्याला कळतं की ती रागावली आहे की कौतुकाने पहाते आहे. वादकानं एखाद्या वाद्यावर दुःखी सूर वाजवले तरी आपलं मन खिन्न होतं. प्रियकर आणि प्रेयसीचा संवाद नेहमी शब्दांतूनच होतो असं नाही. श्रोता आणि वक्ता जेव्हा एकमेकांना पूर्ण समजून घेतात तेव्हा त्यांना शब्दांची गरज भासत नाही, असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. ते म्हणतात...

अर्थु बोलाची वाट न पाहे ।। 
तेथ अभिप्रायचि अभिप्रायाते विये ।।
भावांचा फुल्लौरा होतु जाये ।।
मतिवरी ।।

(अर्थ शब्दांची वाट पहात बसत नाही, तिथं अर्थातूनच अर्थ निष्पन्न होत जातो, आणि बुद्धीवर भावनांचा फुलोरा निर्माण होतो.)

माझं लेखन जर तुम्हाला आवडलं तर ते तुमच्या लक्षात राहील आणि तुमच्यापैकी काही जण अनेक वर्षांनंतरही मला भेटल्यावर शाबासकी देतील. शब्द तुमच्या लक्षात नसतील पण भावना तुम्ही साठवलेल्या असतील असा त्याचा अर्थ.

एकदा का शब्दांचं रुपांतर भावनेत झालं की मग शब्दांची गरज उरत नसेल का ? ...पण मग, असं भावनांमधे रुपांतर होणं ही शब्दांची मर्यादा आहे की सामर्थ्य ? शब्दांच्या मर्यादा समजणं हे आपलं सामर्थ्य ठरू शकेल का ?

या माझ्याच प्रश्नांची उत्तरं शब्दांत देता येतील का हे मला आज तरी माहीत नाही. पण मी शब्दांच्या प्रेमात आहे हे निश्चित !

#विचार #शब्द