shabdashakti_image

शब्दशक्ति

साधे जीवन

ऑस्ट्रेलियातील सॅम्युअल अलेक्झँडर आणि टेड ट्रेनर या (विचार करणाऱ्या आणि जगणाऱ्या) माणसांनी लिहिलेल्या छोटेखानी पुस्तिकेचं मराठी भाषांतर मी काही वर्षांपूर्वी केलं. एका वेगळ्याच कारणानं, या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनशैली बद्दल माझ्या अनेक मित्रांची उत्सुकता गेल्या काही दिवसांत मला दिसून आली.

त्याला निमित्त झालं इराण युद्ध ! जेव्हा घरात अन्न शिजवायला गॅस मिळण्याची पंचाइत व्हायला लागली तेव्हा माझ्या अनेक परिचितांनी माझ्या घरी चालू असलेल्या कचऱ्यापासून स्वयंपाकाचा गॅस बनवणाऱ्या (मिथेन) जैविक संयंत्राबद्दल विचारणा करायला सुरुवात केली. साधे जीवन जगताना अन्न-वस्त्र-निवारा या गोष्टी सर्वांना खात्रीने उपलब्ध होतील अशाच निसर्गस्नेही तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा हे तर साधे जीवन जगण्यामागचं मुख्य सूत्र आहे.

साधे जीवन या पुस्तकातील लेखन पूर्वी "गतिमान संतुलन" या (आज चालू नसलेल्या) मासिकाचे संपादक, निसर्गवादी लेखक आणि कृतिशील कार्यकर्ते श्री. दिलीप कुलकर्णी यांच्या मासिकातूनही क्रमशः प्रसिद्ध झालं होतं.

असं जीवन जगता येतं हे सिद्ध करणारे काही लोक आज आहेत. त्यापैकी आम्ही पति-पत्नी आहोत. If you want to change the world, then be the example. हे गांधीजींचे वाक्य सिद्ध करण्याची संधी आम्ही सदैव साधत असतो. हा न संपणारा प्रयास आणि प्रवास आहे याची जाणीव देखील आम्हाला आहेच.

तुम्ही "साधे जीवन" हे पुस्तक इथे डाउनलोड करू शकता .

#विचार