shabdashakti_image

शब्दशक्ति

तीन चोक सत्तावीस... अर्थात् गाडीने पकडला खुनी !

कॉलेजात त्याला सगळे एस्.एस्. या नावानंच ओळखायचे. त्याचं खरं नाव होतं - सत्यशील सरदेशमुख. तो जगन्मित्र वगैरे नव्हता. पण त्याच्या वर्तुळात आणि बाहेरही त्याचं एस्.एस्. हेच नाव पडलं होतं. अगदी प्राध्यापकांना सुद्धा तो एस्. एस्. म्हणूनच माहिती होता. प्राध्यापकांना तो माहिती होता कारण त्यानं विचारलेल्या शंका सोडवण्यासाठी अनेकदा प्राध्यापकांना तारेवरची कसरत करावी लागायची. कॉलेज युवकांमधे मोबाइल वापरण्याची फॅशन नुकतीच सुरू झाली होती. याच्या कडेही एक साधासा मोबाईल फोन होता. पण फोन ऐवजी आपल्या सायंटिफिक कॅल्क्युलेटर मधल्या वेगवेगळ्या सोयी कशा वापरायच्या हे समजून घेण्यात त्यानं तासन् तास घालवले होते.

रविंद्रनाथांच्या "एकला चलो रे" कवितेचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे एस्. एस्. ! याचं कारण बहुधा त्याच्या बालपणात असावं. त्याचे वडील शामराव सरदेशमुख यांची एक प्रामाणिक सरकारी अधिकारी अशी ख्याती होती. पण एस्. एस्. च्या लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं. सुशिक्षित आईनं एस्. एस्. ला मोठं केलं. वडिलांबद्दलच्या त्याच्या काही आठवणी मात्र तो कधीच विसरू शकणार नव्हता. त्यांच्यात झालेला एक संवाद त्याला नेहमी आठवत असे.

"सत्या, तू पुढे कोण होणार बाळा? " शामरावांनी छोट्या सत्यशीलला विचारलं.

"मला खूप चांगलं व्हायचंय बाबा. " एस्. एस्. म्हणला होता.

"तसं नव्हे रे, मला असं विचारायचंय् की तुझं ज्ञान, कौशल्य तू पुढे कोणाला आणि काय म्हणून विकू इच्छितोस ? " बाबा म्हणाले.

" जे काही चांगलं आहे त्याच्यासाठी मी ते वापरीन." सत्या म्हणाला.

मुलांची निरागसता आणि जगाचा अनुभव नसणं या मुळे एस्. एस्. चं उत्तर भाबडं वाटावं इतकं साधं होतं. शामरावांनी पुढे काहीच विचारलं नाही.

विविध परीक्षांमधे भरपूर मार्क मिळवूनही आईचे पैसे आणि कष्ट वाचवायचे असं ठरवून एस्.एस्. नं व्यावसायिक पदवीसाठी प्रवेश न घेता गणित हाच आपला विषय निवडला आणि एका चांगल्या सायन्स कॉलेजमधे तो दाखल झाला. त्याचे काका कल्याणराव सरदेशमुख यांनी देऊ केलेली आर्थिक मदत त्यानं नम्रपणे नाकारली होती. कल्याणराव सरदेशमुख हे पोलीस खात्यातलं मोठं नाव होतं. एस्.एस्. कॉलेजात शेवटच्या वर्षाला असताना तर कल्याणराव सरदेशमुख हे त्याच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक झाले होते. आपल्या स्वाभिमानी पुतण्याच्या हुशारी आणि कष्टाळूपणा बद्दल त्यांना खात्री होती. त्यामुळे त्यानं स्पर्धा परीक्षा देऊन उच्च सरकारी नोकरी मिळवावी असा लकडा त्यांनी एस्.एस्. च्या मागे लावला होता.

कॉलेजचं शेवटचं वर्ष म्हणजे आपलं कुटुंब चालवण्यात आपला हातभार लागावा अशी समज येण्याचा काळ. जगाचा अनुभव घ्यावा, कॅल्क्युलेटेड का असेना, थोडं साहस करावं असं वाटण्याचा काळ. परीक्षा संपल्यावर एक दिवस सकाळी एस्.एस्. नं ठरवलं की काकांची भेट घ्यायची.

"सत्या, कोणताही धोका पत्करायचा नाही या अटीवर तुझी रिक्वेस्ट मी मान्य करतो. कोणत्याही प्रकारच्या पोलीस कारवाईत खात्याबाहेरचा इसम घेणं फारसं शक्य नसतं. तुला जरी सामील करून घेतलं तरी तुला कोणतेही अधिकार दिले जाणार नाहीत आणि खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळाव्या लागतील. एखाद्या पत्रकारानं निरीक्षण करावं तितपतच तुझा सहभाग अशा पोलीस कारवाईत असू शकेल. तुझ्याकडून काही गोंधळ झाला तर मी तुला वाचवू शकेन असं काही नाही कारण मला देखील माझ्या वरिष्ठांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. पण तुझा स्वभाव बघता या अटींमधे तू बसू शकशील असं मला वाटतं म्हणून माझ्या एका विश्वासू, कर्तव्यदक्ष पण व्यवहारी अशा सहकाऱ्याकडे मी तुला महिनाभर सोपवतो. "

कल्याणरावांनी आपल्या खाजगी लेटरहेडवर इन्स्पेक्टर चौधरींसाठी चिट्ठी लिहिली. एस्.एस्. च्या हातात ती देत ते म्हणाले, " या महिनाभरानंतर तू स्पर्धा परीक्षांच्या मागे लागशील अशी मी आशा बाळगतो. गुड लक ! "

इन्स्पेक्टर चौधरींची चौकी जवळजवळ शहरातच होती. खास चिट्ठी आणलेली असल्यामुळे भेटणाऱ्यांच्या रांगेत बाहेरच्या कॉन्स्टेबलनं त्याचा पहिला नंबर लावला. आतला माणूस बाहेर येई पर्यंत एस्.एस्. चं चौकी निरीक्षण चालू होतं. चौधरींच्या अधिकारात बारा पंधरा कॉन्स्टेबल्स, काही हवालदार, तीन चार पोलीस गाड्या आणि पोलिस कोठडी अशा गोष्टी असाव्यात. चौकीच्या टोकाला एक मारूतीचं देऊळ होतं आणि तिथे गरजूंकडून देणग्या स्वीकारल्या जात होत्या.

दाराबाहेरची घंटा वाजली आणि एस्.एस्. नं साहेबांच्या कचेरीत प्रवेश केला. एका मोठ्या टेवलामागे चौधरीसाहेब बसले होते.

"काय पाहिजे ?" साहेबांनी विचारलं. एस्.एस्. नं काही न बोलता बरोबर आणलेलं चिट्ठीचं पाकीट पुढे केलं आणि तो उभाच राहिला.

" हे काय आहे ? " असं विचारत चिठ्ठी घेताना त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. चिठ्ठी उघडून ती ते वाचू लागले. एस्. एस्. उभाच होता. साहेबांकडे बघत होता. काळा रंग, घारे डोळे रुंद जबडा, कलप उडाल्यामुळे काही ठिकाणी पांढरे दिसणारे डोके,चेहऱ्यावर अधिकारांची जाणीव या साऱ्याचं निरीक्षण करत राहिला. आवाजात जरब आहे हे मघाशीच जाणवलं होतं. चिठ्ठी वाचून संपली.

" बसा सत्यवान साहेब, सावित्री कुठे आहे ? " असं विचारून स्वतःच्या विनोदावर खुष होऊन साहेब गडगडाटी हसले. आपलं नाव बदललेलं एस्. एस्. ला आवडलं नाही पण वरिष्ठांच्या विनोदाला खजिल होऊन का होईना हसावं लागतं हा धडा तो शिकला.

समोरच्या एका खुर्चीत एस्. एस्. नं स्वतःला संकोचानंच ठेवून दिलं. चौधरी साहेबांनी काळा चष्मा चढवला. अनोळखी व्यक्तीचा वेध घेण्यासाठी काळा चष्मा उपयोगी पडतो असं त्यांना वाटत असावं.

" पोलिसांबरोबर काम करणं सोपं नाही. तुम्ही विनावर्दीचे. तेव्हा कोणतेही अधिकार नाहीत. आपला शहाणपणा दाखवायचा नाही. फक्त पहायला आणि ऐकायला परवानगी. तोंडावर बोट. " तीन प्रसिद्ध माकडांपैकी फक्त तोंडावर हात धरलेल्या एकट्याच माकडाचा पुतळा त्यांच्या टेबलावर होता तिकडे त्यांनी बोट केलं, आणि मग काळा चष्मा काढून पुन्हा गडगडाटी हसले. सत्यवानाचं रूपांतर क्षणात त्यांनी एका माकडात केलं हे पाहून एस्. एस्. ला मनात हसू आलं.

" मला काही काम द्याल तर बरं होईल. " एस्. एस्. चाचरत म्हणाला.

" मिळेल मिळेल. " साहेबांनी आश्वासन दिलं.

" काय प्रकारचं काम असेल काही कळेल का ? " एस्. एस्. नं चिवटपणे विचारलं.

" मिळेल मिळेल, काम मिळेल. आणि जरा सबुरीनं घे यंग मॅन. मी देखील होतोच की कधीतरी बावीस वर्षांचा. त्यावेळी करायला आवडलं असतं असं काहीतरी काम शोधीन मी. सरदेशमुखांना काय चौकी झाडण्याचं काम देणार की काय आम्ही ? अं ?"

इन्स्पेक्टर चौधरींचा आवाज बदलला होता. त्यांनी डोळ्यावर पुन्हा काळा चष्मा चढवला. पण तो चढवण्याचं कारण निराळं असावं असा एस्. एस्. ला संशय आला.

चौधरी साहेबांनी एस्. एस्. ला बाजूच्या खुर्चीत बसायला सांगितलं आणि पुढच्या माणसासाठी घंटा वाजवली. दार उघडलं आणि एका हवालदारानं आत येत एक कडकडीत सॅल्युट ठोकला. त्याच्या बरोबर एक फाटक्या अंगाचा माणूस होता. हवालदारानंतर त्यानं देखील साहेबांना सलाम ठोकला.

" एक महत्वाची खबर आहे साहेब, ए, सांग काय ते ..." असं म्हणून हवालदारानं साहेबांना पुन्हा सॅल्युट ठोकला.

" साहेब, गणपत आणि भज्जीरामच्या जुगार अड्ड्यावर मी पत्ते खेळायला जातो साहेब, पण मी पैसे लावत नाही साहेब, आपल्याकडे इतके पैसेच नाहीत साहेब.... "

" अरे xxx, मुद्द्याचं बोल ना xxx " साहेब गुरकावले.

" आपलं नाव सांगू नका साहेब कोणाला .... "

" नाही समजणार... हं बोल.." साहेब पुन्हा गुरगुरले.

" येत्या चार दिवसात फणसूचा गेम होणार आहे साहेब. खबर पक्की आहे साहेब.... "

खबऱ्या बोलत राहिला साहेब ऐकत होते. एस्. एस्. आपल्या खुर्चीला खिळून होता. एखाद्या गुंडाच्या का होईना पण जीवन मरणाची चर्चा फक्त पहायची आणि ऐकायची हे काही फार सोपं काम नाही असं त्याला वाटून गेलं. मात्र टेबलावरच्या माकडाप्रमाणे तोंडावर हात ठेवून तो बसून राहिला.

कणसू आणि फणसू या दोन गुंडांनी आपल्या जिल्ह्याचं नाव अख्ख्या होल महाराष्ट्रात कुप्रसिद्ध केलं होतं. काही आमदारांनी तर त्यांचा विषय काढून विधानसभा देखील गाजवली होती. अंमली पदार्थांची राजरोस विक्री, जुगाराचे अड्डे, डान्स बार, खंडणी मागणे अशा प्रचंड फायदेशीर व्यवहारात कणसू आणि फणसू यांचा हात होता. पैशाचा अतिरेकी हव्यास आणि कोणताही मार्ग निषिद्ध न मानता प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची अतिरेकी महत्वाकांक्षा या त्यांच्या गुणांमुळे ते दोघे राजकारणात शिरणार अशी आवई देखील उठली होती. पूर्वी कधी काळी एकत्र काम करणारे कणसू फणसू आता एकमेकांच्या जिवावर उठले होते. त्यांना प्रसिद्धी मिळवून देण्यात काही पत्रकारांचाही मोठा वाटा होता. काही पत्रकारांनी तर ते जत्रेत हरवलेले सख्खे भाऊ आहेत असाही जावई शोध लावला होता. कणसू आणि फणसू या दोन नावांमधल्या साम्यामुळे तर अनेकांची तशी खात्रीच पटली होती. कणसू फणसू सिनेमात जाणार, स्वतःची क्रिकेट टीम काढणार असल्या बातम्यांच्या हेडलाइन्स करून काही क्षुल्लक वृत्तपत्रांनी त्या दिवशीचा खपही वाढवला होता. काहींना कणसू फणसू हे श्रीमंताना लुटून गरिबांना देणारे रॉबिनहुड असल्याचा साक्षात्कार झाला होता. तर काही वृत्तपत्रांनी मात्र त्यांना सुंद उपसुंद या पुराणातल्या राक्षसांचे अवतार ठरवले होते.

एस्. एस्. ने पोलिस चौकीत जाऊन रोज हजेरी द्यायची असं स्वतःच ठरवलं होतं. पहिले दोन दिवस चौकी आणि चौकीतली माणसं त्यानं पाहिली ऐकली. अगदीच कंटाळा आला तर आपल्या कॅलक्युलेटर वरच्या एखाद्या गणिती कार्याच्या सरावात त्यानं वेळ घालवला.

मग तो तिसरा दिवस उजाडला....

इन्स्पेक्टर, सब-इन्स्पेक्टर यांचे मोबाईल सतत चालू होते. चौकीतल्या लँडलाइनला तर उसंतच नव्हती. कॉन्स्टेबल मंडळींची धावपळ चालू होती. ड्रायव्हर मंडळी व्हीलसमोरच बसून होती. ठरलेले खास लोक शस्त्रसज्ज होत होते. चौधरी साहेब शांतपणे पण भराभर ऑर्डर्स देत होते. एका जाळीवाल्या पिंजरा गाडीत जाऊन बसायला त्यांनी एस्. एस्. ला फर्मावलं. एस्. एस्. आपली वैज्ञानिक आयुधं घेऊन पिंजऱ्यात जाऊन बसला. साध्या कपड्यातला एखादा गडी पंचनामा करायला लगेच हाती गवसावा असा त्यांचा हिशेब असावा. ही गडबड चालू असतानाच पी.एस्.आय्. पाटील यांच्या मोबाइल वर "तो" एस्. एम्. एस्. येऊन थडकला.

Phansu murdered by Kansu in Delta Beer Bar.

फणसूचा गेम झाला होता. पण पोलिसांना अपेक्षित वेळेआधीच. स्वतः कणसूनेच लोकांच्या देखत फणसूच्या डोक्यात जवऴून गोळी घातली होती. मात्र आय विटनेस म्हणून कोणी पुढे येत नव्हतं. प्रचंड गोंधळ माजला होता आणि त्याचा फायदा घेऊन कणसू निसटला.

चौधरी साहेबांनी पाटील पी. एस्. आय. ना डेल्टा बार वर जाऊन परिस्थिती हाताळायची आणि पंचनामा सुरु करायची ऑर्डर दिली. स्वतः जीप मधे बसून त्यांनी ड्रायव्हरला शहराच्या दुसऱ्या टोकाकडे असणाऱ्या अल्फा बार कडे जायला सांगितले. अनपेक्षितपणे, एस्. एस्. असलेली पिंजरा गाडी त्यांनी आपल्या गाडीच्या मागे बोलावली. सहा पोलिसांच्या कोंडाळ्यात एस्. एस्. अल्फा बारच्या दिशेनं जात होता. आजवरच्या आयुष्यात कधीच आला नाही असा अनुभव त्याला येणार होता. उत्सुकता, भीती, उत्साह अशा संमिश्र भावनांचा खेळ त्याच्या मनात चालू होता. एक मोठं वळण घेऊन गाडी अल्फा बारच्या दारात थांबली.

सकाळ असल्यामुळे बारच्या आवारात फक्त एकच गाडी उभी होती. आत गिऱ्हाइकं देखील फार नसावीत. मध्यमवयीन असले तरी ज्या तडफेनं चौधरी साहेब गाडीतून उतरले ते पाहून एस्. एस्. चा त्यांच्या बद्दलचा आदर आणखी वाढला. एक हात पट्ट्यावरच्या पिस्तुलावर डावीकडे ठेवून साहेबांनी एक एक पायरी गाळत बार समोरचा जिना पार केला आणि फक्त दोन शस्त्रधारी पोलिसांसह त्यांनी बारमधे प्रवेश केला.

पिंजरा गाडीतले पोलिस आता आवारात उतरले होते. एकाच्या हातात मायक्रोफोन आणि कर्णा होता. ऑर्डर आली की लगेच लोकांसाठी सावधानतेचा इशारा देण्यासाठी तो सज्ज होता. इतक्यात बार बाहेरच्या रस्त्यावर चार पाच गाड्या कचाकच ब्रेक लावून थांबल्या. कॅमेरे सावरत सात आठ लोक बारच्या आवारात धावत आत आले. बातमी कशी पसरते याचं एस्. एस्. ला नेहमीच कुतुहल वाटत आलं होतं. मात्र गाडीतच पिंजऱ्यामधे जीव मुठीत धरून तो बसून होता.

बारच्या आत काय नाट्य चालू होतं ते कळायला काही मार्ग नव्हता. पण गोळीबाराचे आवाज आले नाहीत. तेव्हा बऱ्यापैकी आलबेल असावं असा अंदाज एस्. एस्. नं केला.

दोनच मिनिटांत दोन पोलिसांच्या मध्यभागी हात वर करून पांढऱ्या शुभ्र कडक इस्त्रीच्या कपड्यात एक उंच, सडपातळ, नाकेली, चष्मेवाली व्यक्ती बाहेर आली.

" हाच कणसू .." एक पोलिस कॉन्स्टेबल म्हणाला.

" हा.. कणसू ?? " एस्. एस्. ला प्रश्न पडला. "एखाद्या सिनेनटासारखं रुबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या माणसाचं नाव कणसू असेल?"

तितक्यात कणसूच्या मागून पिस्तुल हाती घेतलेले चौधरी साहेब बाहेर आले. पत्रकार कॅमेऱ्यांसकट कणसू आणि साहेब यांच्या दिशेनं धावू लागले. पोलिसांनी ठराविक अंतरावर त्यांना रोखून धरलं.

" पोलिसांनी कुविख्यात गुंड कणसू याला अटक केली आहे. प्रतिस्पर्धी टोळीचा प्रमुख फणसू याच्या खुनाच्या आरोपाखाली ही अटक केली आहे. " इन्स्पेक्टर चौधरींनी पत्रकरांना सांगितलं.

हात वर केलेल्या अवस्थेतच कणसू म्हणाला, " माझा त्या कृत्याशी काहीही संबंध नाही. मी अर्ध्या तासापूर्वीच इथे येऊन बसलो होतो. मला माझ्या वकिलांशी संपर्क साधायचा आहे. कारण तो माझा हक्क आहे. " पत्रकार समोर असताना कणसूनं हे म्हटलं याचा अर्थ त्याला कायदा थोडा तरी समजत असावा असा एस्. एस्. नं अंदाज बांधला.

पत्रकारांनी चौधरी साहेबांना आणखी छेडण्याचा प्रयत्न केला पण " जिल्ह्यात आता शांतता नांदेल अशी आशा करायला हरकत नाही. " याशिवाय काहीही बोलायला त्यांनी नकार दिला. कणसूने मात्र पुन्हा संधी साधून " मी पूर्वीच इथे येऊन बसलो आहे. त्यामुळे माझा खुनाशी काहीही संबंध नाही. " या वक्तव्याचा पुनरुच्चार केला.

कणसूला घेऊन जाण्याआधी चौधरींनी कणसूच्या बारच्या आवारात ठेवलेल्या गाडीचा पंचनामा करण्याचा आदेश दिला आणि कणसूला पिंजरा गाडीतून चौकीत नेण्याचा इशारा केला. ही संधी साधून एस्. एस्. नं पिंजऱ्यातून आपल्या आयुधांच्या बॅगसहित बाहेर उडी मारली. पंचनामा करण्याच्या कामात त्याचा पोलिसांना उपयोग होणार होता.

कणसूच्या गाडीची तपासणी करून गाडीचा नंबर, रंग, मेक आणि ती कोणत्या रस्त्यापासून किती अंतरावर लावली होती याच्या नोंदी पोलिसांनी पंचनाम्यात केल्या. हे होत असताना एस्. एस्. नं एका कॉन्स्टेबलच्या मदतीनं गाडीचं बॉनेट उघडलं आणि इंजिन मधल्या पाण्याचं तापमान नोंदवलं. १९० अंश फॅरनहीट. या पुढे त्या तापमानाची वेळ देखील नोंदवलीः सकाळी १०-४५. पुढचा आदेश येई पर्यंत एस्. एस्. आणि त्याच्या पोलिस सहकाऱ्यांना फारसं काम नव्हतं. कॅल्क्युलेटर आणि थर्मामीटर बाजूला ठेवून एस्. एस्. नं त्याच्या नव्या सहकाऱ्यासोबत चहापान केलं. गप्पा मारल्या आणि सुसंवादाचं एक दालन खुलं करून ठेवलं. बरोबर ११-१५ वाजता, म्हणजे पहिल्या मोजणी नंतर अर्ध्या तासानं एस्. एस्. नं त्याचं दुसरं निरीक्षण नोंदवलंः ११० अंश फॅरनहीट. त्यानंतर अर्ध्या तासानं म्हणजे पावणे बारा वाजता तिसरं निरीक्षण नोंदवलं ९० अंश फॅरनहीट. तोवर साहेबांच्या आदेशाची वाट पहात सारे बसून होते.

रस्त्यावरची रहदारी पूर्ववत सुरू झाली होती. एस्. एस्. ला भूक लागली होती. चौकीत जाऊन चौधरी साहेबांची भेट घेऊन जेवायला जाई पर्यंत दुपारचे अडीच वाजले. सकाळ पासून घडलेल्या नाट्यमय घटनांमुळे एक प्रकारचा थकवा एस्. एस्. ला जाणवत होता. आपण केलेल्या कामाचा एक लहानसा अहवाल गाडीच्या पंचनाम्यात जोडावा अशी विनंती करून चौधरी साहेबांच्या परवानगीनं एस्. एस्. नं आपला मोर्चा घराकडे वळवला.

पुढच्या पूर्ण महिनाभर इतक्या नाट्यमय घटना काही घडल्या नाहीत. पण हे दिवस समाजातल्या एका वेगळ्याच कप्प्याशी ओळख करून घेत एस्. एस्. नं घालवले. त्यानं लिहिलेला अहवाल साहेबांना फार महत्वाचा वाटला नाही. पण कागदाच्या चळतीत आणखी दोन कागद घुसडायला त्यांची हरकत नव्हती.

शेवटची परीक्षा संपली होती. एक महिन्यात एक वेगळा अनुभवही घेऊन झाला होता. तेव्हा मोकळ्या वेळात स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अभ्यास, वाचन करायचं एस्. एस्. नं ठरवलं. पोलिस अधीक्षक कल्याणराव सरदेशमुखांना, आपल्या काकांना, आपल्या या अभ्यासाबद्दल एस्. एस्. नं सांगितलं. त्यांनी पुतण्याला जी वेगळी संधी दिली होती त्याला अनुरूप असा हा प्रतिसाद होता.

मात्र या अभ्यासावर एस्. एस्. खुष नव्हता. मानवी कायद्यातली पोथीनिष्ठा त्याला आवडत नव्हती. इतिहास म्हणजे चावून चोथा झालेल्या गोष्टी असं त्याला वाटे. राज्यघटना, अर्थशास्त्र यांतले सिद्धांत आणि वस्तुस्थिती यात फार तफावत असते असं त्याला जाणवे. असे दोन महिने त्यानं त्या कंटाळवाण्या घोकंपट्टीत घालवले. मग मात्र तो दिवस उजाडला.

सगळे कायदेशीर सोपस्कार पार पडल्यावर फणसू खून खटला प्रत्यक्ष घटनेनंतर ४ महिन्यांनी कोर्टात उभा राहिला. कणसूला जेव्हा कोर्टात आणण्यात आलं तेव्हा कोर्ट खच्चून भरलं होतं. सरकारी वकिलांनी आरोप वाचून दाखवले आणि सर्व आरोप कणसूनं स्पष्टपणे नाकारले.

" मी समाजातल्या प्रतिष्ठित लोकांसाठी क्लब आणि मद्यालये चालवतो. क्लब आणि मद्यालये चालवण्याचा रितसर परवाना माझ्याकडे आहे. ज्यावेळी डेल्टा बार मधे खून झाला त्याच्या आधी पासूनच मी अल्फा बार मधे बसलो होतो. मी यापेक्षा अधिक काही बोलू इच्छित नाही. " स्पष्ट आणि ठणठणीत आवाजात, रुबाबात हे निवेदन कणसूनं केलं तेव्हा त्याचे प्रसिद्ध वकील जयेंद्र मुजुमदार यांनी कौतुकानं मान डोलावली. काही दिवस साक्षी पुरावे चालू होते. तज्ञांचे अहवाल सादर होत होते. कडक शिक्षा आणि बिनशर्त सुटका या दोन पारड्यातली वजनं न्यायाचा काटा कधी इकडे तर कधी तिकडे असं झुकवत होती. सरकारी वकिल झेंडेंकडून प्रयत्न अजिबात कमी पडत नव्हते पण त्यांचा आत्मविश्वास कमी होतोय् की काय असं थोडंसं वाटायला लागलं होतं.

कागदाच्या ढिगाऱ्यातून उपयोगी माहिती शोधून काढताना कणसूच्या गाडीच्या पंचनामा अहवाल झेंडे वकिलांना सापडला पण त्यातल्या दोन पानांत जे लिहिलं होतं त्याचा नेमका अर्थ त्यांना कळेना. चौकशी करून त्यांनी एस्. एस्. ला भेटीसाठी बोलावून घेतलं. सरकारी वकिलांच्या कार्यालयात एस्. एस्. नं त्यांची भेट घेतली. झेंडे वकिलांना विज्ञानाची पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे "या अहवालाचा निष्कर्ष थोडक्यात आणि सोप्या शब्दांत सांगू शकाल का ?" असं त्यांनी एस्. एस्. ला विचारलं.

" सांगतो की.. " एस्. एस्. म्हणाला.

" हा अहवाल असं सांगतो की आरोपी कणसू म्हणतो त्याप्रमाणे अटकेपूर्वी अर्धा तास तो बार मधे आला नव्हता तर अटके आधी केवळ पाच ते सात मिनिटेच तो बार मधे येऊन बसला असावा. माझ्या मते खून करून घाईने तो गाडीतून अल्फा बार मधे आला आणि दारू पीत बसला. "

" तुमचं मत कोर्टात तुम्हाला सिद्ध करता येईल का ? तसं करायला कोर्टात हजर रहाल का ? " सरकारी वकील झेंडे यांनी विचारलं.

" नक्कीच ! " एस्. एस्. म्हणाला.

सरकारी वकीलांनी खास साक्ष देण्यासाठी एस्. एस्. ला कोर्टात बोलावलं.

" माझा अहवाल न्यूटनच्या वस्तू थंड होण्याच्या नियमाला अनुसरून आहे. न्यूटनचा हा नियम हजारोंनी प्रयोग करून तपासला आहे आणि त्यामुळे तो अत्यंत विश्वासार्ह आहे. "

एस्. एस्. नं आपलं बोलणं चालू ठेवलं...

" गरम वस्तू थंड होताना ती आजूबाजूच्या वातावरणाला आपली उष्णता देत असते. त्यामुळे वस्तू थंड होण्याचा वेग सुरुवातीला खूप जास्त असतो. नंतर हा वेग खूपच मंदावतो. कमी होणारं तापमान आणि वेळ यांचा गणिती संबंध ज्या समीकरणानं दाखवता येतो ते समीकरण घातांक समीकरण असतं. म्हणजेच एकरेषीय नसतं, एका पाढ्यात बसणारं नसतं. अशा समीकरणाच्या नव्या पाढ्यात तीन चोक सत्तावीस देखील असू शकतात. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर खूप गरम पाणी अधिक वेगानं थंड होतं, आणि कोमट पाणी थंड होण्याचा वेग फार कमी असतो. आता माझ्या नोंदीविषयी सांगतो. "

तापमान आलेख

" माझी पहिली नोंद सकाळी सव्वा अकराला केली होती. ती आहे १९० अंशांची. अर्ध्या तासानंतरची म्हणजे सव्वा अकराची नोंद आहे ११० अंशांची आणि पावणेबाराची नोंद आहे ९० अंशांची. गाडी बंद केल्यावर इंजिनाचं तापमान कमी होत गेलं तसं त्यातील पाण्याचं देखील. पहिल्या अर्ध्या तासात अतिशय वेगानं पाणी थंड झालं आणि नंतरच्या एक तासात त्याचा थंड होण्याचा वेग मंदावला हे कोणालाही पटेल. माझ्या अहवालात ही गोष्ट मी एका आलेखानं दाखवली आहे. हा आलेख आता उलटा वाचला, म्हणजे १९० अंशाच्या वर वाढल्याची कल्पना केली तर पहिल्या नोंदीच्या अर्ध्या तास आधी, ज्यावेळी कणसू बार मधे आल्याचा दावा करीत होता त्यावेळी, त्या पाण्याचं तापमान २७० अंश असायला पाहिजे. पण हे अशक्य आहे कारण पाण्याचं तापमान २१२ अंशा पेक्षा वाढतच नाही. २१२ अंश या तापमानाला पाणी उकळतं. "

" आपण असा जर विचार केला की खून करून आल्याबरोबर कणसूनं गाडी बारच्या आवारात लावली, आणि काही मिनिटातच त्याला अटक झाली तर मात्र पहिल्या निरीक्षणाचं तापमान १९० हे विज्ञानाच्या दृष्टीने शक्य वाटतं. याचा दुसरा अर्थ असा आहे की कणसू खोटे बोलत आहे. तो तिथे आल्याबरोबर लगेच काहीच मिनिटात त्याला अटक झाली होती. "

एस्. एस्. ची साक्ष गाजली. वृत्तपत्रांनी त्याचं वर्णन मराठी शेरलॉक होम्स असं केलं. सुदैवानं जज्जसाहेबांना विज्ञान विषयाची पार्श्वभूमी होती.

खटल्याचा निकाल लागला. कणसू १५ वर्षांसाठी गजाआड गेला. चौधरी साहेबांना बढती मिळाली. जिल्हा पोलिस अधीक्षकांचा मान वाढला. मात्र पत्रकारांना चुरचुरीत बातम्यांसाठी नवे उगम शोधावे लागले. एक गाजलेलं टोळीयुद्ध पर्व संपलं. अनेकांना दिलासा मिळाला.

एस्. एस्. ला या खटल्यात एक महत्वाचं उत्तर सापडलं होतं हे तर खरंच. त्याच्या अहवालावर जरी निकाल पूर्णपणे अवलंबून नव्हता तरी त्याच्या गणिताचा आणि अहवालाचा, निकाल देताना नक्कीच विचार केला गेला होता. पण त्याला काही प्रश्नही नव्यानं पडले होते आणि त्यांची उत्तरं मात्र मिळत नव्हती. मिळालीच तर अस्वस्थ करत होती.

" पोलिसांनी फणसूचा खून होणार हे आधी कळल्यावर देखील उपाय योजना म्हणून कणसूला आधीच ताब्यात का घेतलं नाही ?"

" खून झाल्याबरोबर इतर कुठेही न जाता अल्फा बार कडेच साहेबांनी आपला मोर्चा कशामुळे वळवला ? " एस्. एस्. स्वतःशीच बोलत होता."

" पेपरवाले म्हणतात तसा मी काही डिटेक्टिव्ह नाही. शेरलॉक होम्स नाही. पिस्तुल वापरून मी बॉंडगिरी करण्याची शक्यता नाही. मानवी संबंध मी दुरूनच न्याहाळतो. माणसांचे कायदे मला आकर्षित करत नाहीत. काय आहे आज आणि काय असणार आहे उद्या माझी भूमिका ? "

एस्. एस्. ला रात्री शांत झोप लागली नाही. पण सकाळी उठला तेव्हा त्याला छान ताजं तवानं वाटत होतं. काल रात्री झोपताना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यानं स्वतःलाच दिलं.

" मी आहे एस्. एस्., माझी भूमिका आहे सत्य-शोधक अशीच ! "

#कथा #रहस्यकथा